पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या १७ वर्षीय मुलांचा संघ मनपा जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत दणदणीत विजयी..

एरंडोल ( कुंदन ठाकुर)
जिल्हा क्रीडा विभाग जळगाव व जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मनपा जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा नुकत्याच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कुलचा १७ वर्षीय मुलांचा संघ सेंट तेरेसा स्कुलच्या संघाला १-० ने पराभूत करून या स्पर्धेचा मानकरी ठरला. तसेच १७ वर्षीय मुलींचा संघ उपविजयी ठरला. याच स्पर्धेत अगोदरच पोदार स्कुलच्या १४ वर्षीय मुले व मुली यांचे संघ विजयी ठरले आहेत.
या स्पर्धेत १७ वर्षीय गटात एकूण २२ संघ सामील झाले होते. या स्पर्धेवेळी पोदार स्कुलच्या मुलांच्या संघाने ५ विविध फेऱ्या पार करून विजय साधत संघ एकजुटीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. ५ वेगवेगळ्या फेरीत पोदारच्या संघाने आर. आर. विद्यालय विरुद्ध २-० ने विजय पटकावला, एल एच पाटील इंग्लिश मध्यम स्कूल, एम.जे कॉलेज, इकरा स्कूल यांच्या विरुद्ध पेनल्टी शूट आऊट पद्धतीने विजय मिळवला, तर अंतिम फेरीत सेंट तेरेसा स्कुलच्या संघाला १-० ने पराभूत केले.
अंतिम पूर्व फेरीत गोलरक्षक हेमल वर्मा या विद्यार्थ्याने उत्कृष्ट गोलरक्षकाचे प्रदर्शन करत विरुद्ध संघाला खुपच अडचणीत आणले. तसेच अंतिम फेरीत रितीश चौधरी या खेळाडूने १ गोल करत संघाला विजय मिळवण्यात मोलाचा वाट उचलला. या स्पर्धेत रितीश चौधरी हा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. संस्कार पाटील व पियुष वराडे या खेळाडूंनी सुद्धा १-१ गोल करत या स्पर्धेत मोलाची कामगिरी बजावली.
या स्पर्धेत विजयी होण्यासाठी पोदार इंटरनॅशनल स्कूलचे क्रीडा शिक्षक सौ छाया बोरसे, श्री निलेश चौधरी, श्री वैभव काकड यांनी परिश्रम घेतले.
प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी विजयने संघाचे कौतुक करत पुढील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीचे सातत्य टिकवण्याचे प्रोत्साहन दिले.
या वेळी शाळेचे उप प्राचार्य श्री दिपक भावसार, पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ उमा वाघ, प्रशासकीय अधिकारी श्री जितेंद्र कापडे व शिक्षकवृंद यांनी सुद्धा विजयी संघाचे कौतुक केले.