पत्रकारांचा अवमान करणाऱ्या बावनकुळेंनी माफी मागावी :नाना पटोले.

24 प्राईम न्यूज 26 Sep 2023
पत्रकारांना ढाब्यावर चहापाणी देऊन भाजपला अनैतिक मार्गाने सत्ता मिळवण्याचे
आणि चालवण्याचे पाप झाकता येणार नाही, अशी टीका नाना पटोले यांनी सोमवारी
नागपूरमध्ये बोलताना केली. पत्रकारांचा अवमान करणाऱ्या बावनकुळे यांनी राज्यातील
पत्रकारांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. जे भाजपच्या पोटात आहे तेच
बावनकुळेंच्या ओठावर आले आहे. अनैतिक मार्गाचा वापर करून सत्तेत यायचे आणि
सत्तेत आल्यावर भ्रष्टाचार करून पैसा कमावयाचा. त्याच पैशाचा वापर करून अनैतिक
मार्गाने पुन्हा सत्तेत यायचे हेच भाजपचे एक कलमी धोरण आहे. अरुणाचल प्रदेश,
कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि महाराष्ट्रातही भाजपने अशाच प्रकारे सत्ता
मिळवली, अशी टीका पटोले यांनी केली. महाराष्ट्राला पत्रकारितेचा मोठा समृद्ध वारसा
आहे. लोकमान्य टिळकांसारख्या संपादकांनी इंग्रज सरकारचे डोके ठिकाणावर आहे का,
असा परखड सवाल आपल्या अग्रलेखातून जुलमी इंग्रज सरकारला करून जाब विचारला
होता. आता चंद्रशेखर बावनकुळेंचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न विचारण्याआधी
बावनकुळेंनी पत्रकारांची माफी मागावी, असे नाना पटोले म्हणाले.