पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी!

प्रतिनिधि(कुंदन सिंह ठाकुर)
आज ,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५४ वी व भारतीय स्वातंत्र्य सेनानी लाल बहादूर शास्त्री यांची ११९ वी जयंती जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कु.गौरी राऊत हिने नियोजित कार्यक्रमाची रूपरेषा मांडली तसेच सूत्रसंचालन केले. शालेय परिपाठाच्या वेळी उपरोक्त कार्यक्रम घेण्यात आला. शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी त्यांनी उपस्थितांचे तसेच शिक्षक पालक संघाच्या प्रतिनिधींचे स्वागत केले. यावेळी कु.ग्रीष्मा आमोदकर या इ. ७ वी च्या विद्यार्थिनीने आपल्या भाषणातून देशभक्तांच्या महान कार्याला व समर्पणाच्या भावनेला उजाळा दिला. थोर नेत्यांचे कृती आणि शब्द हे भावी पिढीसाठी मार्गदर्शन व प्रेरणेचे अखंड स्त्रोत ठरले आहेत असे मत मांडले.महात्मा गांधीनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आचरणात आणावा असे मत मांडले. कु.जयदीप पाटील या इ. ७ वी तील विद्यार्थ्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची वेशभूषा साकारून भारत मातेचा जयजयकार केला. याप्रसंगी महात्मा गांधी यांचा जीवनपट उपस्थित विद्यार्थ्यांसमोर उलगडला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी द.आफ्रिकेतील रेल्वेस्थानकावरील दिलेली अपमानास्पद वागणूक,त्यातून देशाला जुलमी इंग्रजी राजवटीपासून मुक्त करण्याचा निग्रह ,जालियानवाला बाग हत्याकांडाचे उत्तर सत्य आणि अहिंसा मय लढ्यातून देण्याचा संकल्प,असहयोग आंदोलन,दांडी यात्रा-मिठाचा सत्याग्रह,स्वदेशी मोहीम,भारत छोडो आंदोलन व भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य या प्रसंगाचे नाट्यमय आणि रोमांचकारी प्रस्तुतीकरण विद्यार्थ्यांनी केले. कु.रेयांश भारंबे या इ.७ वी तील विद्यार्थ्याने आपल्या भाषणातून लाल बहादूर शास्त्रींच्या असीम कार्याचा प्रेरणा पट श्रोत्यांसमोर प्रस्तुत केला.भारताला ‘जय जवान,जय किसान’ घोषवाक्य देणाऱ्या लाल बहादूर शास्री या थोर देश्भाक्तानी स्वातंत्र्यपूर्व काळातील योगदान तसेच स्वातंत्र्योत्तर भारत पाक युद्धात बजावलेल्या कणखर भूमिकेचे वर्णन केले. शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी थोर राष्ट्रपुरुषांच्या जीवनातील प्रसंग विद्यार्थ्यासमोर मांडले व त्यांचे विचार आचरणात आणण्यासाठी प्रेरित केले.संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. सत्य व अहिंसा ही तत्वे भारताने जगाला दिली आहेत व आधुनिक काळातही भारताने सत्याची बाजू घेत अहिंसा मय भूमिका बजावली आहे. शास्त्रीजींच्या जय जवान,जय किसान या घोषवाक्याला जय विज्ञान आणि जय अनुसंधान हे शब्द जोडले जावेत ही काळाची गरज आहे असेही ते यावेळी म्हणाले. राष्ट्रसेवेला सर्वोच्च प्राथमिकता देणाऱ्या या महान नेत्यांचा हा देश नेहेमीच ऋणी राहील असा विश्वास दर्शविला.विद्यार्थी जीवनात शिक्षणाला सर्वोच्च महत्व देवून सत्याची कास धरली पाहिजे असा उपदेश केला.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून महान देशभक्तांसाठी दर्शविलेल्या आदर व सन्मानाची त्यांनी विशेष प्रशंसा केली. या प्रसंगी शाळेचे उप-मुख्याध्यापक दिपक भावसार, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थिती दर्शविली होती.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.