अजित पवारांच्या घरवापसीच्या चर्चेने राजकीय वातावरण तापले..

24 प्राईम न्यूज 4 Oct 2023मंगळवारचा दिवस राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडीचा ठरला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत. हे दोन्ही नेते अचानक दिल्लीला गेले असल्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिंदे आणि फडणवीस आज मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. अजित पवारांची नाराजी आणि राष्ट्रवादीकडून वाढता दबाव हे या दिल्ली दौऱ्यामागचं कारण आहे का ? असाही प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. परंतु राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा आहे. आजच्या राज्याच्यामंत्रिमंडळाच्या बैठकीलाही ते उपस्थित राहिले नव्हते. राज्याचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्रीपदाचा अद्याप न सुटलेला पेच यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे- फडणवीसांवर मोठा दबाव असल्याची चर्चा आहे. त्याचमुळे आता हे दोन्ही नेते दिल्लीला गेलेत की काय अशी चर्चा आहे.