मोफत तपासणी । मोफत उपचार । मोफत औषधी । तरीही उदासिनताच-आश्चर्य
एरंडोलच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची अशीही शोकांतिका..

एरंडोल /कुंदन ठाकुर दवाखाना म्हटला की गर्दी परंतू एरंडोलला हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आपला दवाखाना मात्र त्यासाठी अपवादच म्हणावा लागेल. ना गर्दी ना पेशंट, सर्वत्र सामसूम, शांतताच शांतता….
जुना नगरपालिकेत (वि. का. सोसायटीसमोर) एरंडोलला सदर दवाखाना 15 वा वित्त आयोगामार्फत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणून दवाखाना सुरू आहे. वास्तविक याठिकाणी मोफत तपासणी । मोफत उपचार । मोफत औषधी मिळणार असल्याचा ठळक फलक लावलेला असून, आपला दवाखाना असल्यानंतर देखील क्वचितच (म्हणजे नगण्यच) उपचारासाठी आल्याची माहिती मिळाल्याने तर धक्काच बसला कारण शहरात जवळपास सध्या सर्वच दवाखाने फुल्ल असून डेंग्यूची साथ जोरात सुरू आहे.
आपल्या दवाखान्यात सर्वच मोफत असून देखील आणि विशेष म्हणजे शहरातच उपचार होणार तरीही पेशंट मात्र फिरकतच नाहीत. त्यामुळे कर्मचारी बिचारे हात बांधून, खूर्ची सांभाळून आरामशीर जीवन जगत आहेत. शासनाने जागा, निधी, औषधी, कर्मचारी उपलब्ध करून देवून देखील नागरीकांनी पाठ फिरविल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. यासाठीची उदासिनता संतापजनक आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांचे फोटो ठळकपणे आहेत. त्यात सर्व सुविधा, आभा ओळखपत्र आदींचा उपचारासाठी (मोफत) लाभ घेण्याचे आवाहन केलेले आहे. मात्र हे सर्व खरे असले तरी पण लक्षात कोण घेतो ? हा खरा सवाल असून यात दोष कुणाचा, गौडबंगाल आहे की काय ? याबाबत मात्र जनमानसात उलटसुलट चर्चा आहे.