जनतेची दिशाभूल करणे बंद करा.. -सुप्रिया सुळे..

अमळनेर/प्रतिनिधिभाजप म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा. त्यामुळे भाजपने माफीनामा, माफीनामा असे ओरडत ढोंगीपणा करून जनतेची दिशाभूल करणे अगोदर बंद करावे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी एक्सवरून केली. काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारने आपल्या कार्यकाळात कधीही कंत्राटी तत्वावर कार्यकारी पदे भरली नव्हती, असा खुलासाही त्यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचे पाप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे असल्याचे सांगत या प्रकरणी शरद पवार, ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली होती. फडणवीस यांच्या या मागणीचा सुळे यांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, कंत्राटी पद्धत कुणी सुरु केली याचा शोध भाजपने जरुर घ्यावा, मात्र राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांनी संघटीतपणे केलेल्या विरोधापुढे हे सरकार झुकले आहे. आता आपले अपयश लपविण्यासाठी माफिनाम्याचे खूळ भाजपने काढले आहे. त्यांना जुने संदर्भ काढून आपल्या चुकांचे खापर पूर्वसूरींवर फोडायची खोड आहे. उगाच वडाची साल पिंपळाला लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा ज्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालविता त्यांच्याशीदोन शब्द बोलून घेतले असते तरी आपण हे ‘हवाबाण’ सोडण्याची हिंमत केली नसती, अशी टीका सुळे यांनी केली. कंत्राटी भरतीचा निर्णय २०११ आणि २०२१ सालच्या मंत्रिमंडळाने केला म्हणायचे आणि दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत सत्ता उपभोगायची या स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजण्याच्या भाजप वृत्तीचे कार्ड महाराष्ट्राच्या जनतेपुढे मुळीच चालणार नाही, असे सुळे यांनी एक्समध्ये नमूद केले..