जुनी पेंशन योजनेसाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवा
शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची नाना पटोले यांच्याकडे मागणी..

अमळनेर/प्रतिनिधि

राज्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी,यासाठी काँग्रेस पक्षाने विधिमंडळलाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठविण्याची मागणी येथील शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
सोबतच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व टप्याटप्याने अनुदानावर आलेल्या राज्यातील बावीस हजार कर्मचारी देखील न्यायाच्या प्रतीक्षेत असून त्यांना देखील न्याय मिळवून द्यावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. जे सरकार जुनी पेन्शन योजना लागू करणार तेच सरकार सत्तेवर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ओबीसी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील,शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष आर.जे.पाटील, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक तूषार पाटील,टीडीएफ चे तालुकाध्यक्ष सुशील भदाणे,ग्रंथपाल संघटनेचे जितेंद्र ठाकूर,टीडीएफ चे राहुल पाटील,
उच्च माध्यमिक संघटनेचे प्रा.हिरालाल पाटील, समता शिक्षक परीषदेचे अजय भामरे,बापूराव ठाकरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.