गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे..

24 प्राईम न्यूज 31 Oct 2023

मराठा आरक्षणाला हिंसक वळण लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. गृहमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे. मला असे वाटते की राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुमचा सगळा रेकॉर्ड काढून पाहा. गेले एक महिना सातत्याने मी गृहमंत्रालयाचे फेल्युअर सांगत आहे. जर एका आमदाराच्या घरावर असा हल्ला होणार असेल तर त्याची नैतिक जबाबदारी ही गृहमंत्रालयाची आणि या खोके सरकारची आहे,” अशा शब्दांत त्यांनी फडणवीस यांना लक्ष्य केले. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “या महाराष्ट्रात काही कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ४० दिवस सांगितले होते. पण आज जी परिस्थिती ओढवली आहे, त्याला जबाबदार हे महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकार आहे. या सरकारला खोके घ्यायला वेळ आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाची फक्त फसवणूक करण्याचे पाप भाजपने केले आहे, असा माझा या सरकारवर आरोप आहे. “