स्वच्छ सर्वेक्षण २०२३ करीता बचत गटांमार्फत एरंडोल शहरात राबविण्यात आला जनजागृतीपर उपक्रम..

एरंडोल ( प्रतिनिधी) एरंडोल नगर पालिका मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ ची एरंडोल शहरात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता एरंडोल शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असणे आवश्यक आहे. त्याकरिता एरंडोल नगरपालिकेने पालिकेकडे एन.यु.एल.एम. अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या सईबाई महिला स्वयंसहाय्यता गटा मार्फत एरंडोल शहरातील 10 वार्ड मध्ये जाऊन जनजागृती करण्यात आली. यामध्ये नागरिकांना ओला, सुका व घरगुती धोकादायक कचऱ्याचे वर्गीकरण समजाविण्यात येऊन त्याचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच एरंडोल नगरपालिका सदर कचऱ्यावर कशा प्रकारे प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यात येतो याची देखील माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी सरस्वती काँलनीतील श्री.प्रकाश पाटील सर यांचे घरी जाऊन त्यांनी केलेले किचन गार्डनची पाहणी केली. त्याचप्रमाणे त्यांनी गार्डन मधील कचरा व घरातील ओला कचरा पासुन कंपोस्ट खत कसे तयार केले? हया विषयीचे उदाहरण इतर नागरिकांना देण्यात आले.
त्याचप्रमाणे एरंडोल न.पा. मार्फत सुरु असलेल्या नाविन्यपूर्ण अशी स्मार्ट गृहिणी या स्पर्धेबाबत शहरातील सर्व वार्डात जाऊन ज्या महिला ओला व सुका कचरा वेगवेगळा वर्गीकृत करून न.पा.च्या घंटा गाडीत जमा करतील त्यांना दररोज एक कुपन देवून ज्या महिलांकडे 30 कुपन जमा असतील अशा प्रत्येक वार्डातील महिला़ंची नावे लकी ड्राँ पद्धतीने काढून त्यांना एरंडोल नगरपरिषदेकडून पैठणी देण्यात येईल, अशी माहिती सईबाई महिला स्वयंसहाय्यता गटा मार्फत नागरिकांना देवून जनजागृती करण्यात आली.
तसेच एरंडोल शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरातील कचरा ओला, सुका व घरगुती धोका दायक कचरा अशा प्रकारे वर्गीकृत करून न.पा. च्या येणाऱ्या घंटा गाडीतच टाकावा. जे नागरिक इतरत्र कचरा टाकतील त्यांच्यावर एरंडोल नगरपालिकेमार्फत दंडात्मक कार्यवाही हाती घेण्यात येईल, असे आवाहन न.पा.चे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. विकास रमेश नवाळे यांनी केले.