पुण्यात साखळी बॉम्बस्फोटाचा कट
अतिरेक्यांना सीरियामधून सूचना..

24 प्राईम न्यूज 8 Nov 2023 शहरात पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट अतिरेक्यांनी आखला होता. त्यासाठी दहशतवाद्यांना थेट सीरियामधून सूचना मिळत होत्या, असा खळबळजनक दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे. आयसिसच्यामहाराष्ट्र गटातील दहशतवाद्यांना सीरियातून याबाबतच्या सूचना मिळाल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे.
एनआयएने सहा दिवसांपूर्वी कोंढव्यातून पसार झालेला दहशतवादी मोहम्मद शहानवाज आलम उर्फ शफिकूर रहमान आलम याला अटक केली. त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले नसले तरी तो एनआयएच्या कोठडीत आहे. त्याच्या चौकशीतून पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट समोर आला. दहशतवाद्यांना साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सीरियामधून आदेश मिळत होते. साखळी बॉम्बस्फोट किंवा मोठा घातपात घडवून दहशत निर्माण करण्याचा कट त्यांनी आखला होता. पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या इतर आरोपींशी शाहनवाझ आलमचा थेट संबंध असल्याचे तपासातून समोर आले आहे.