करीम सालार व दिव्य जळगाव नाझिया शेख यांना समन्स.. न्यायालयात हजर होण्याचे आदेश…

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव येथील दुसरे कनिष्ठ न्यायमूर्ती श्री व्ही सी जोशी यांनी शुक्रवार १३ जानेवारी रोजी करीम सालार व दिव्य जळगावच्या नाझीया शेख यांच्या विराधात *प्रोसेस इशू* करून समन्स काढून न्यायालयात हजर होण्याचे आदेश पारित केले.
मानहानी व अब्रू नुकसानी बद्दल फारुक शेख यांची न्यायालयात फौजदारी तक्रार
इकरा उर्दू हायस्कूल प्रताप नगर व सालार नगर या दोन्ही शाळेतून चार लहान विद्यार्थ्यांना दाखले घरी पाठवून शाळेतून कमी केल्याबद्दल फारुक शेख यांनी १५ जून२२ रोजी जिल्हा दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना भेटून इकरा हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी लहान मुलांविरुद्ध कसा अन्याय केला याबाबत निवेदन दिले होते व तशा बातम्या वर्तमानपत्र व सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्या होत्या.१६ जून रोजी इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष करीम सालार यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया दिव्य जळगावच्या संचालिका नाझिया शेख यांना एक पंधरा मिनिटांची मुलाखत दिली होती व सदरची मुलाखत यु ट्युब साइटवर दिव्य जळगाव या चॅनलने अपलोड करून प्रसारित केली होती व ती बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध ग्रुपमध्ये सुध्दा प्रसिद्ध झाली होती.
करीम सालार यांनी मुलाखती द्वारे खोटे,असत्य व मानहानी कारक वृत्त प्रसिद्ध केले.
सालार यांनी आपल्या मुलाखतीत फारुक शेख हे चार मुलांची काळजी घेण्याचे आव आणीत असून ६०० विद्यार्थी असलेली अलफैज संस्था बंद करत आहे, शाळेच्या बिल्डिंगची बांधकाम परवानगी ला विरोध करीत आहे, जळगाव शहरातील सर्व उर्दू शैक्षणिक संस्था विरोधात कार्य करीत आहेत,बायपास सर्जरी झाल्यानंतर मी आता काड्या करणार नाही व समाज सेवा करेल असे बोलले होते, मिल्लत व इतर शाळांवर केसेस करून आपल्या भाऊ व जावयांना नोकरी लावली, असे खोटे, असत्य व मानहानीकारक मुलाखत दिल्याने फारुक शेख यांनी जळगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात एस.सी सी. नंबर १७५६/२०२२ दिनांक १६ जुलै २०२२ रोजी भारतीय दंड विधान कायदा ५०० व ३४ प्रमाणे तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीवर न्यायालयाने पडताळणी करून, प्रतिज्ञापत्र व फारुक शेख यांनी सादर केलेले कागदपत्र व पेन ड्राईव्ह मधील मुलाखतीचे अवलोकन करून करीम सालार व दिव्य जळगावच्या संचालिका नाझीया शेख यांच्या विरोधात *गुन्ह्याची दखल घेण्यास पुरेसे कारण आहे व सदर प्रकरणी दोन वर्षा आतील शिक्षा असल्याने गुन्ह्याची दखल घेण्यास पुरेशी कारणे आहे असे मत न्याय दंडाधिकारी जोशी यांनी आपल्या आदेशात नमूद करून दोन्ही आरोपी विरुद्ध भा द वी ५०० व ३४ प्रमाणे कारवाई करणे साठी न्यायालयात हजर होणे बाबत समन्स काढले असून पुढील चौकशी ची तारीख २७ फेब्रुवारी २३ रोजी निश्चित केलेली आहे*
फारूक शेख यांच्या वतीने अडव्होकेट खुशाल जाधव यांनी युक्तिवाद केला.
न्यायालयीन प्रक्रियेवर पूर्ण विश्वास – फारुक शेख
१६ जून २२ रोजी करीम सालार यांनी संपूर्ण समाजामध्ये मी अलफैज संस्था बंद करीत असल्या बाबत खोटी व असत्य माहिती तसेच जळगाव शहरातील उर्दू शैक्षणिक संस्था बंद करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप लावला एवढेच नव्हे तर शैक्षणिक संस्थांना ब्लॅकमेल करून आपले भाऊ व जावई यांना नोकरीला लावले असा खोटा आरोप व बदनामी केल्याने न्यायालयात धाव घ्यावी लागली व न्यायालयाने सकृत दर्शनी पुराव्यावरून करीम सालार व नाझीया शेख यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्ह्याची दखल घेतली असून न्यायालय निश्चितच न्याय देईल अशी अपेक्षा फारुक शेख यांनी व्यक्त केली आहे.