अमळनेर काँग्रेसच्या पदाधिकारी नियुक्त्यांना तूर्तास स्थगिती..

अमळनेर/प्रतिनिधि काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच झालेल्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष
आणि कार्याध्यक्ष यांच्या नियुक्त्या निरीक्षकांचा अहवाल सादर होईपर्यंत तूर्त स्थगित झाल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वीच प्रदेश काँग्रेसचे संघटन व प्रशासन सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नावाने पत्र पाठवून अमळनेर तालुकाध्यक्षपदी धनगर पाटील व तालुका कार्याध्यक्षपदी भागवत केशव सूर्यवंशी (पूर्व विभाग), अॅड. गिरीश प्रकाश पाटील (पश्चिम विभाग) तर शहराध्यक्षपदी मेहराजुद्दीन शेख अल्लाउद्दीन यांची व शहर कार्याध्यक्षपदी समाधान कंखरे (पूर्व विभाग), प्रवीण गंगाराम पाटील (मुख्य शहर भाग) यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने करण्यात आल्याचेही पत्रात म्हटले होते.नियुक्तीचे पत्र व्हायरल होताच नूतन अध्यक्ष व कार्याध्यक्षावर अभिनंदनाचा वर्षाव झाला आणि लागलीच प्रदेश काँग्रेसकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यांनतर प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या मान्यतेने अमळनेर शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत निरीक्षक नेमण्यात आले आहेत. निरीक्षक आल्यानंतर सर्वांचे म्हणणे ऐकून घेतील.
त्यांनतर ते प्रदेश पातळीवर अहवाल पाठवतील. प्रदेश पातळीवरून – जिल्हाध्यक्षांना कळवण्यात येईल आणि त्यांनतर जिल्हाध्यक्ष नियुक्ती करतील, तोपर्यंत या नियुक्त्यांना तात्पुरती स्थगिती असेल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली.
