आरक्षणाच्या वादात पडू नका. -राज ठाकरे

24 प्राईम न्यूज 23 Nov 2023
आरक्षणाच्या वादात पडू नका. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवा आणि

कामाला लागा, असे मार्गदर्शन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बुधवारी केले. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर बुधवारी मनसे कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी सध्याच्या घडामोडींवर आणि येणाऱ्या निवडणुकींवर चर्चा करण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी येत्या काही दिवसांमध्ये आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करू, असे उपस्थितांना सांगितले. गोरेगाव येथे लवकरच मनसे पक्षाची बैठक पार पडणार आहे. त्याचवेळी राज ठाकरे हे आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, परंतु ज्यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे जालन्यातील आंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसले होते. त्यावेळी राज यांनी जरांगेंची भेट घेतली होती. तेव्हा अशाप्रकारे आरक्षण मिळणार नाही, असे त्यांच्याकडून जरांगे यांना सांगण्यात आले होते, परंतु काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी जरांगे-पाटील यांचा बोलविता धनी कोण आहे? असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला जरांगे यांनी ठाण्यातील सभेतून उत्तर दिले आहे. आमच्या मागे कोण आहे हे लवकरच शोधून सांगा. तुमच्या जास्त ओळखी आहेत. आमच्या कमी आहेत. लवकर शोधून आणा. आम्हाला फक्त त्यांचे नाव सांगा. आमच्या मागे कोण आहे ? आम्हीच त्याला नीट करतो. आमच्या मागे एकच आहे आणि तो म्हणजे मराठा समाज. ते आम्हाला माहीत आहे, असेही प्रत्युत्तर जरांगे यांच्याकडून देण्यात आले होते.
