राज्य शासनामार्फत आदिवासी सेवक पुरस्काराचे सन्मानित श्री युवराज दगजीराव पाटील..

अमळनेर/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनातर्फे आदिवासीच्या विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या

व्यक्तीस दरवर्षी आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. सन 2022/23 या वर्षासाठीचा महाराष्ट्र राष्ट्र शासनातर्फे श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी, पिंपळे बुाा, ता. अमळनेर, जि. जळगांव चे सचिव व नंदुरबार तालुक्यातील शिंदगव्हाण येथील श्री. युवराज दगाजीराव पाटील यांना देण्यात आलेला आहे.
श्री. युवराज पाटील यांचे शैक्षणिक व सामजिक क्षेत्राच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे खऱ्या अर्थाचे कार्य केल्याचे दिसुन येते. संस्थेची पिंपळे बुाा, ता. अमळनेर, जि. जळगांव येथे आदिवासी विद्यार्थ्यासाठी पहिली ते बारावी पर्यत आश्रमशाळा व नंदुरबार येथील राजे शिवाजी विद्यालय मिळून आता पर्यंत आदिवासी समाजाच्या 25 वर्षात सुमारे 15000 विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेतले आहे. यातील बरेचसे विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन पोलिस खाते, सिमा सुरक्षाबल, वैद्यकिय व अभियांत्रीकी क्षेत्रात कार्यरत असून समाज उपयोगी कार्याचे बाळकडू त्यांना येथूनच मिळाले आहे. शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात राज्य पातळीवर जाण्याची परंपर त्यांनी कायम राखली आहे. काही विद्यार्थ्यांना स्वंयरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आल्यामुळे ते स्वंयरोजगार करीत आहेत. आज देखील या शाळेत 1000 विद्यार्थी निवासी रहात आहेत. या शाळेत शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्याचे आरोग्य, क्रिडा, पर्यावरण शिक्षण याकडे विशेष लक्ष देण्यात येते. एवढेच नव्हे तर दरवर्षी मुलांमुलींना स्वंयरोजगाराचे विशेष प्रशिक्षण देण्यात येते. आदिवासी समाजासाठी केलेल्या उल्लेखनिय कामाबददल महाराष्ट्र शासनाने श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी या संस्थेस सन 2006/07 या वर्षाचा आदिवासी सेवा संस्था पुरस्कार देवून गौरविण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र राज्य आदिवासी आश्रमशाळा संस्था चालक संघटनेचे ते विभागीय सरचिटणीस आहेत. त्या निमित्ताने ते राज्यातील गडचिरोली, धारणी, जि. अमरावती पासुन नंदुरबार जिल्हयातील धडगांव व अक्कलकुवा पर्यतच्या अनेक आश्रमशाळांना प्रत्यक्ष भेटी देवून आदिवासीचे जीवनमान जवळून पाहून त्यांच्या विविध समस्याचा अभ्यास करुन आदिवासी समाजासाठी विविध सामाजिक कार्य करण्याचा संकल्प त्यांनी केला. आदिवासी बोलीभाषेचा जास्तीत जास्त वापर शिक्षणात करावा यासाठी माडिया, पावरा, भिल्ल इ. भाषेचे शब्दकोष असलेली पुस्तिका तयार करुन ती शाळांमध्ये उपलब्ध करुन देण्याचे काम त्यांनी केलेले आहे. बोलीभाषेचा मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकांनी वापर करावा यासाठी ते पाठपुरावा करीत असतात. एवढेच नव्हे त्यांनी काही आदिवासी बोलीभाषा स्वतः शिकून घेतल्यामुळे आदिवासी समाजाची संस्कृती पंरपरा तसेच होळी, भोंगऱ्या बाजार, नवाई, वाग्देव, डोंगऱ्यादेव इत्यादी सण व उत्सवात सहभागी होत असतात
आदिवासी समाजात व्यसनमुक्ती, बालविवाह, दारुबंदी, घुटकाबंदी, अंधश्रध्दा, डाकीन प्रथा, स्त्रीभ्रुण हत्या यासाठी महिला व सरपंच यांचे मेळावे घेऊन याबाबत उदबोधन करण्यात आलेले आहे. यासाठी त्यांनी अमळनेर, जि. जळगांव येथे महात्मा गांधी व्यसनमुक्ती संस्कार केंद्रही सुरु केलेले आहे. याबाबत विविध वृत्तपत्रातून लेख लिहून जनजागृती करण्याचे काम ते करीत असतात. त्याशिवाय आदिवासी बांधवानी पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी बांबू लागवडीचे प्रशिक्षण तरुणांना देऊन आदिवासी भागात मोठा प्रमाणात बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहेत.
दरवर्षी नंदुरबार व अमळनेर येथे आदिवासी व गरीब लोंकासाठी आरोग्य शिबीरे आयोजित करणे, रक्तदान शिबीरे आयोजित करणे, कृषि व पर्यावरण विषयक सेमिनार आयोजित केले. त्याचप्रमाणे शाळेत शिकणा-या मुलींसाठी, मेंहदीकाम, हस्तकला, शिवणकला, ब्यूटी पार्लर, संगणक, मोबाईल दुरूस्ती इ. करिता लहान लहान प्रशिक्षण शिबीरे आयोजित केलेले आहेत. आदिवासी महिलांना बचतगटाच्या माध्यमातून स्वंयरोजगार याबाबत मार्गदर्शन करतात.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फौडेंशन यामार्फत राज्यातील विशेषतः आदिवासी व दुर्गम भागातील सुमारे 800 गांवाचा धर्मादाय सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून विकास करण्यात येत असून या फौडेंशन मध्ये ते सल्लागार म्हणून काम करीत असतांना नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगांव, नवापूर व नंदुरबार तालुक्यातील 17 गावांच्या आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी उल्लेखनिय काम केलेले आहे.
खऱ्या अर्थाने आदिवासी समाजासाठी, आदिवासी मुलांमुलीसाठी त्यांचे अतुलनीय कामाबददल त्यांना देण्यात आलेला पुरस्कार हा सार्थ असे म्हणावेसे वाटते. त्यांच्या कामाबददल शुभेच्छा व अभिनंदन..