मुलींना लखपती बनवणारी लेक लाडकी योजना नेमकी आहे काय?

24 प्राईम न्यूज 28 Nov 2023 राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींच्या सक्षमिकरणासाठी

लेक लाडकी योजना राबवण्यास आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्याच्याअर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेनुसार राज्य सरकारनं महाराष्ट्रात लेक लाडकी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळं मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत लखपती होणार असून योजनेचा फायदा राज्यातील लाखो गरीब कुटुंबांना होणार आहेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेच्या अंमलबजावणीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानुसार १ एप्रिल २०२३ पासून जन्मलेल्या सर्व मुलींचा या योजनेत समावेश होणार आहे.
काय आहे ही योजना ?
मुलींचा जन्मदर वाढविणं, मुलींच्या शिक्षणास चालना देणं, मुलींचा मृत्यूदर कमी करणं, बालविवाह रोखणं, कुपोषण कमी करणं आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं या उद्देशानं लेक लाडकी योजना राज्यात राबवण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर त्या कुटुंबाला ५ हजार रुपये देण्यात येतील. मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये अशा पद्धतीनं त्या मुलीस एकूण १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ दिला जाणार आहे. १८ वर्षांची होईपर्यंत मुलीला लखपती बनविणारी ही योजना आहे कोणाला मिळेल लाभ?
१ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या १ अथवा २ मुलींना त्याचप्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.
दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र आई किंवा वडिलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणं गरजेचं असेल.
१ एप्रिल २०२३ पूर्वी १ मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलींना स्वतंत्र लाभ देण्यात येईल.
लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं.