मराठा समाजाला ओबीसीत बॅक एन्ट्रीला विरोधच-भुजबळ.

24 प्राईम न्यूज 6 Dec 2023
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमचा कोणाचाही विरोध नाही, परंतु कुणबी दाखले मिळवून ओबीसी प्रवर्गात बॅक डोअर एन्ट्रीला आमचा विरोध आहे. त्यामुळे आम्ही ती न्यायालयात रद्द करू, असे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.

नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे-पाटलांवर तोफ डागली. जरांगे-पाटील यांनी आपल्या सभेत भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि भुजबळांवर टीका केली. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, ते रोजच बोलत असतात. मी पंधरा-वीस सभांनंतर बोलतो, मात्र मी बोललो की भुजबळ मराठा ओबीसीत संघर्ष निर्माण करत असल्याचे वातावरण तयार केले जाते.मी काही गुंड घेऊन फिरत नाही, पिस्तूल घेऊन फिरत नाही,
जाळपोळ करणाऱ्यांना सोडा म्हणून सांगत नाही तरीही माझ्या बोलण्याचा विरोध होतो. माझा लढा लोकशाही मार्गाने सुरू आहे. त्यात मला जे अधिकार मिळाले आहेत त्यानुसार मी माझी भूमिका मांडत आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्यातील सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांचेदेखील ओबीसी आरक्षणाला धक्का न
लागता मराठा आरक्षण दिले पाहिजे या भूमिकेवर एकमत आहे. ओबीसी प्रवर्गात सध्या जी काही बॅक डोअर एन्ट्री होत आहे, त्याला आमचा प्रखर विरोध आहे. बॅक डोअर एन्ट्री मिळेल, ती आम्ही न्यायालयात जाऊन रद्द करू असेही ते म्हणाले. जरांगे यांनी गिरीश महाजनांचे व्हिडीओ सर्वांसमोर आणू, असा इशारा दिला.
यावर बोलताना भूजबळ म्हणाले, जरांगे काहीही बोलू शकतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ते ताबडतोब बोलवू शकतात. त्यामुळे आमच्यासारख्या मंत्र्यांची काय गत, असा टोला लगावत ओबीसी समाजाने काय भूमिका घ्यायची हे सांगायला जरांगे काय महाराष्ट्राचा नेता नाही, असा टोलाही भूजबळ यांनी लगावला.