देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली.
नौदलातील तरुणाला अटक..

24 प्राईम न्यूज 15 Dec 2023

भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याबद्दल महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एका २३ वर्षांच्या तरुणाला ठाण्यातून अटक केली आहे. या तरुणाचे नाव गौरव पाटील आहे. हा तरुण नेव्हल डॉक येथे शिकाऊ (सिव्हिल अॅप्रेंटिस) उमेदवार म्हणून काम करत होता. हा तरुण व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानमधील गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात होता. माहिती पुरवल्याच्या बदल्यात त्याने ऑनलाईन पैसे घेतल्याचे तपासात पुढे आले आहे.एप्रिल-मे ते ऑक्टोबर २०२३ महिन्यात तो फेसबुक आणि व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात होता. याप्रकरणी एटीएसने एकूण ४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतर ३ जण गौरव पाटीलच्या संपर्कात होते, असेही एटीएसने सांगितले आहे. गौरव हा ठाण्यातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता. त्याने आयटीआयचे शिक्षण घेतले असून ६ महिन्याच्या नौदलाच्या प्रशिक्षणासाठी रुजू झाला होता.
एटीएसला मिळालेल्या माहितीच्या आधारे गौरवची चौकशी केली. त्यात फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याची अज्ञात व्यक्तिंशी ओळख झाल्याचे सांगितले. पुढे ते चांगले मित्र झाले. त्यानंतर गौरव एप्रिल-मे २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत फेसबुक व व्हॉट्सअॅपद्वारे २ पाकिस्तानातील इंटेलिजन्स ऑपरेटिव्हशी संपर्कात असल्याचे पुढे आले. या गौरवने दोघांनाही सोशल मीडियावरून भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील गोपनीय माहिती वेळोवेळी पुरविली आणि त्या बदल्यात ऑनलाईन पैसे स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गौरव व त्याच्या संपर्कातील इतर ३ व्यक्ती अशा एकूण ४ इसमांविरुद्ध दहशतवाद विरोधी पथकाने ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.