जरांगे मुंबईत धडकणार!
२० जानेवारीपासून आझाद मैदानावर उपोषण..

24 प्राईम न्यूज 24 Dec 2023. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील २० जानेवारी २०२४ रोजी मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. राज्यातील तब्बल तीन कोटी मराठा आंदोलकांचा जनसागर त्याच दिवशी शांततेच्या मार्गाने मुंबईत दाखल होणार असल्याची घोषणा शनिवारी बीड येथे झालेल्या विराट निर्धार सभेत जरांगे यांनी केली.
मराठा समाजाचा जनसागर बीड येथे लोटला होता. या सभेत बोलताना जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाची फसवणूक करू नका. असे म्हणत समाजाच्या अनेक मागण्या आक्रमक शैलीत मांडल्या. मराठा समाजाच्या आंदोलकांच्या विरोधातील गुन्हे मागे घ्यावेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, सारथीसाठी पुरेसा निधी द्या, राज्यातील वसतिगृहे सुरू करा, आदी मागण्याही आपल्या भाषणात केल्या. सरकारने १८ जानेवारीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. म्हणून २० जानेवारीला मुंबईत दाखल होण्याचा व आमरण उपोषणाला सुरुवात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तब्बल तीन कोटी मराठा आंदोलक शांततेच्या मार्गाने मुंबईत पोहोचणार असल्याचा दावाही त्यांनी केला.