शिवसेना शिंदेंचीच!
विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकरांचा महानिकाल..

24 प्राईम न्यूज 11 Jan 2023. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा महानिकाल बुधवारी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी दिला. सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी निकाल वाचन करत केंद्रीय निवडणूक आयोगापाठोपाठ खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाचीच असल्याचे शिक्कामोर्तब नार्वेकर यानी केले. सोबतच शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने परस्परांवर केलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिका फेटाळून लावत दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवले. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असलेल्या शिवसेनेच्या पक्ष घटनेचा आधार घेत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांनी बजावलेला पक्षादेश (व्हीप) अमान्य करीत भरत गोगावले यांचा व्हीप वैध ठरवला. प्रभू यांना विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्याचा अधिकारच नव्हता. तसेच त्यांनी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली असा कोणताही पुरावा सादर करता आला नाही, असे स्पष्ट करीत नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला. ठाकरे गटाने हा निर्णय अमान्य करीत या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.