राष्ट्रवादीची कमान अजित पवारांकडे !शरद पवार यांनी पक्ष गमावला..

24 प्राईम न्यूज 7 फेब्रू 2024. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केले आहे. शरद पवार यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. शिवसेनेच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचाही निकाल आयोगाने दिला आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा निकाल आल्याने अजित पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निवडणूक आयोगाच्या निकालाचा दाखला देण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्याही आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू असून निकाल लवकरच अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाचा निकाल बाजूने लागल्याने अजित पवार गटाला अपात्रता प्रकरणात देखील त्याचा आपसुक फायदा होणार आहे.निवडणूक आयोगाचा निकाल आपण विनम्रपणे स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी एक्स या माध्यमातून दिली आहे. आपल्या नावासमोर त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस असे लिहिले आहे. तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. निकालानंतर अजित पवार यांच्या बाजूच्या कार्यकत्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.