अशोक चव्हाण भाजपवासी ! -काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर २४ तासातच कमळ हाती • -भाजपकडून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता.

24 प्राईम न्यूज 14 Feb 2024
काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा तसेच भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि मराठवाड्यातील काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी अवघ्या २४ तासात म्हणजे मंगळवारी भाजपचे कमळ हाती घेतले. काँग्रेस पक्ष सोडणे हा माझा वैयक्तिक निर्णय असून तो निर्णय घेणे मात्र कठीण होते, अशी कबुली अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेशानंतर दिली, आपण प्रामाणिकपणे भाजपात काम करू आणि आगामी निवडणुकीत पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणू, असा विश्वास भाजपला दिला आहे. राज्यसभेसाठी अशोक चव्हाण यांचे नाव अंतिम झाले असून ते भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस ग असून महायुतीचे सर्व उमेदवार एकाचवेळी अर्ज भरतीलअशोक चव्हाण यांनी अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश करताना चव्हाण यांनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपचा झेंडा हातात घेत भाजपात प्रवेश केला. यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करताना राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीत योगदान दिले पाहिजे या हेतूने आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.