बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक ते राज्याचे मुख्यमंत्री; जोशीसरांचा संघर्षमय प्रवास..

24 प्राईम न्यूज 23 Feb 2024. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले. जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र, वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शिवसेनेच्या संघर्षाचा काळ आठवला असून शिवसेना परिवारावर मोठी शोककळा पसरली आहे. शिवसेना आज दोन गटात विभागली असली तर प्रत्येक शिवसैनिकांमध्ये जोशी यांचे स्थान अढळ होते. शिवसेनेचे नगरसेवक ते राज्याचे मुख्यमंत्री, लोकसभा सभापती असा त्यांचा राज्यात १९९५ मध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर दिवंगत नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना संधी असतानाही स्वतः मुख्यमंत्री न होता, त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे ठरवले. त्यावेळी, डॉ. मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांची नावे स्पर्धेत होती. अखेर, बाळासाहेबांनी मनोहर जोशींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशींचं नाव इतिहासात लिहिलं गेलं.
मुंबई महापालिकेत क्लर्कपदी नोकरीस असलेल्या मनोहर जोशींनी नोकरीचा राजीनामा देत राजकारणात प्रवेश केला. समाजकारणाच्या उद्देशाने व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे मनोहर जोशी यांनी १९६७ साली शिवसेनेत प्रवेश करत राजकारणात सक्रीय सहभागी झाले. पुढे महानगरपालिकेत नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास पाहायला मिळाला. विशेष म्हणजे १९९९ ते २००२ या काळात ते लोकसभेचे अध्यक्षदेखील राहिले आहेत. दरम्यान, महायुतीमध्ये ४ वर्षे मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर केवळ बाळासाहेबांच्या दोन ओळीच्या आदेशावर त्यांनी आपलं मुख्यमंत्रीपद सोडले होते..