बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचा मार्ग मोकळाशिक्षण मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शिक्षकांचा बहिष्कार मागे.


24 प्राईम न्यूज 26 Feb 2024. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने कोणत्याही अनुकूल हालचाली न केल्याचा आरोप करत कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाने दोन दिवसांपूर्वी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला होता. यामुळे बारावीच्या इंग्रजी, हिंदी, मराठी विषयाच्या सुमारे २२ लाख उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम रखडले होते. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतलीया बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शिक्षक संघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याचे मंत्री दीपक केसरकर आणि महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांनी जाहीर केले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली १५ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत आयटी आणि इतर शिक्षकांचे समायोजन, १२ आणि २४ वर्षांनंतरची कालबद्ध पदोन्नती, २४ वर्षांनंतर २० टक्क्यांप्रमाणे दिल्या जाणाऱ्या पदोन्नती ऐवजी एकाच वेळेला सर्वांना पदोन्नती देणे, याचप्रमाणे काही दीर्घकालीन मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. यापैकी वित्त विभागाशी संबंधित असलेल्या मागण्यांचे प्रस्ताव वित्त विभागाकडे दिले जाणार आहेत, तर दीर्घकालीन मागण्यांबाबत शासन स्तरावर स्थापन समिती निर्णय घेणार आहे. समिती जे निर्णय घेईल ते सर्वांनाच लागू असतील. याबाबत रविवारी पुन्हा चर्चा झाली. या बैठकीत शिक्षण सचिव रणजीतसिंह देवल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, सहसचिव तुषार महाजन, महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, समन्वयक प्रा मुकुंद आंधळकर, सरचिटणीस प्रा. संतोष फासगे, उपाध्यक्ष प्रा. सुनील पूर्णपात्रे उपस्थित होते.