फडणवीसांना माझा बळी हवाय ! ■ सलाईनमधून विष देण्याचा, एन्काऊंटर करण्याचा कट-मनोज जरांगे. ■ त्यांना मराठ्यांची एकी मोडायचीय, देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप.


24 प्राईम न्यूज 26 Feb 202. मराठा आरक्षणाच्या मागणीसह ‘सगे सोयरे’ संबंधातील अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील एकेकाळचे सहकारी कीर्तनकार अजय महाराज बारसकर आणि संगीता वानखेडे यांच्या आरोपांनंतर चांगलेच आक्रमक झाले आहेत. रविवारी अंतरवाली सराटीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी या दोघांनाही प्रत्युत्तर दिले. तसेच या दोघांचे बोलविते धनी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीसच आहेत, असा आरोपही जरांगे यांनी केला.
एवढ्यावरच न थांबता १० टक्के आरक्षण घेऊन मी गप्प बसावे अन्यथा आधी मला बदनाम करून आणि सलाईनमधून विष देऊन किंवा एन्काऊंटर करून ठार मारण्याचा कट देवेंद्र फडणवीस यांनी रचला आहे. ते मला एखाद्या गुन्ह्यात अडकवू पाहत आहेत. मी उपोषण करतानाच मरावे यासाठी त्यांनी इतके दिवस मला झुलवत ठेवले आहे. त्यांनी जसे इतर पक्षांमधील नेते संपवले आहेत, तसेच ते मलाही संपवतील असे त्यांना वाटत आहे. फडणवीसांना माझा बळी हवा आहे. त्यांना मराठ्यांची एकजूट मोडायची आहे. मी संपलो की मराठ्यांची एकजूट संपेल असे त्यांना वाटत आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे काही लोक सामील आहेत. असे एक ना अनेक गंभीर आरोप केल्यावर आता मीच तुमच्या मुंबईतील सागर बंगल्यावर येतो. तुमच्या पोलिसांना सांगा, की मनोज जरांगे आल्यावर त्याला गोळ्या घाला, असे आव्हानही मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना दिले.