जरांगेंचे उपोषण स्थगित दोन गुन्हे दाखलः मुंबईत येण्याचा बेतही बारगळला..

24 प्राईम न्यूज 27 Feb 2024. मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काल सरकाला आव्हान देण्याची भाषा केल्यानंतर सरकारने आक्रमक पवित्रा घेत त्यांची कोंडी केली आहे. त्यातच तीन जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केल्याने आता जरांगे पाटील यांना आंतरवाली सराटीतच परतावे लागले आहे.

मनोज जरांगे यांच्या आक्रमक पवित्र्याने आंदोलकही आक्रमक झाले असून, सोशल मीडियावर यासंबंधी अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. तसेच व्हीडिओ, फोटोही व्हायरल होत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात १० तास इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी हे आदेश काढले. दरम्यान, तीर्थपुरी येथे बस जाळल्याने या तीन जिल्ह्यातील बससेवाही बंद करण्यात आली आहे.
जरांगे यांच्यावर गुन्हे दाखल
बीड जिल्ह्यातील दोन ठिकाणी परवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे व त्यांच्या समर्थकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना घडली तेव्हा जरांगे घटनास्थळी हजर नव्हते. तरीही त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. कारण त्यांच्या आवाहनानंतर समर्थकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. ८० जणांच्याविरोधात गुन्हा नोंदवला.