लेट लतीफ पदाधिकाऱ्यांचा फटका राज ठाकरे पुण्यात बैठक न घेताच परतले.

24 प्राईम न्यूज 4 Mar 2024. एरव्ही पक्ष प्रमुख, मोठे नेते आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे बैठका किंवा सभांना उशिरा पोहोचल्याचे अनेक दाखले देता येतील, परंतु र्विवारी खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या लेट लतीफगिरीचा फटका बसला. सुमारे तासभर वाट बघूनही पुण्यातील विभागप्रमुख आणि पदाधिकारी बैठकीसाठी नियोजित ठिकाणी न पोहोचल्याने नाराज झालेले राज ठाकरे यांनीतडकाफडकी मुंबई गाठली. यामुळे पुढची बैठक होणार का, असा प्रश्न पदाधिकारी आणि विभाग प्रमुखांना पडला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने पुण्यातील विभाग प्रमख आणि पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक बोलवली होती. आधी बैठकीची वेळ सकाळी ११ वाजता ठरली होती, मात्र नंतर बैठकीची वेळ बदलून दुपारी २ वाजता करण्यात आली. राज ठाकरे विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांसोबत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार होतेत्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांना दुपारी २ ते २.१५ दरम्यान पक्ष कार्यालयात पोहोचणे अपेक्षित होते. राज ठाकरे दुपारी सव्वा २ वाजता पक्ष कार्यालयात पोहोचले. राज ठाकरे आल्याचे समजताच काही पदाधिकारी आणि विभाग प्रमुखांची तारांबळ उडाली. ते कसेबसे विभाग प्रमुख कार्यालयापर्यंत पोहोचले, परंतु मुख्य पदाधिकारी आणि विभाग प्रमुख पक्ष कार्यालयात पोहोचले नव्हते. त्यामुळे राज ठाकरे यांनी तासभर सर्वांची वाट बघितली, हे पदाधिकारी उशिरा पोहोचल्याने राज ठाकरेंना राग अनावर झाला आणि ते बैठक सोडून तडकाफडकी मुंबईकडे रवाना झाले.