मनोज जरांगे-पाटलांचे फडणवीसांना पुन्हा आव्हान.

24 प्राईम न्यूज 4 Mar 2024
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी २५ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करताना अपशब्दांचा वापर केला होता. या प्रकरणानंतर आता मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार आहे. त्यावरून मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मी एसआयटी चौकशीसाठी तयार आहे. फडणवीसांनी मला आत टाकून दाखवावेच, त्यानंतर भावनिक लाट काय असते हे त्यांना दिसेल. तुमचा सगळा सुपडा साफ होईल, असे आव्हान मनोज जरांगे यांनी फडणवीसांना दिले आहे.
मनोज जरांगे यांनी आपले आमरण उपोषण स्थगित करून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. तसेच पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करत मराठा समाजासोबत Q संवाद साधण्याचे त्यांनी ठरवले आहे. मनोज जरांगे रविवारी बीड जिल्ह्यातील वानगाव या ठिकाणी दाखल झाले. यावेळी त्यांनी मराठा समाजबांधवांना मार्गदर्शन केले. मराठे काहीही करू शकतात. सरकारने तर आमचे बॅनर आणि फलक काढण्याच्या सूचना दिल्या आहेत, पण निवडणुकीत तुम्हालाही आमच्या गावात बॅनर लावायचे आहेत. आमच्या घरावर पत्रक चिकटवायचे आहेत. तेव्हा आम्हीही सहन करणार नाही, असे म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांना लक्ष्य केले.
मनोज जरांगे म्हणाले की, न्यायालयाने आम्हाला शांततेत रास्ता रोको करण्याचे निर्देश दिले होते. तरीही आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आम्ही काहीही करणार नव्हतो. माझ्या उपोषणाचा १५ वा दिवस असताना २२ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने १३ मार्चला पुढील तारीख दिली होती, पण एका रात्रीत गृहमंत्र्यांनी तारीख बदलून २३ फेब्रुवारी करून घेतली. एवढेच नाही तर मनोज जरांगेला १० टक्के आरक्षण स्वीकारायला लावा, नाहीतर त्याला कोणत्यातरी गोष्टीत गुंतवा’ असा ठराव झाल्याचे कळल्यामुळे त्यादिवशी आमच्याकडून आक्रमक प्रतिक्रिया दिली गेली, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.