शिखर बँक घोटाळाअजित पवार यांच्या सुटकेला ईडीचा विरोध.

24 प्राईम न्यूज 4 Mar 2024.
कोट्यवधी रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुटका होण्याची शक्यता धूसर बनली आहे. घोटाळ्याचा तपास गुंडाळण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या भूमिकेला ईडीने विरोध केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या ‘क्लोजर रिपोर्ट’वर ईडीने आक्षेप घेतला आहे. याबाबत विशेष सत्र न्यायालय ५ मार्चला ईडीचा युक्तिवाद ऐकणार आहे. त्यामुळे अजित पवार यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपासून वेगळी चूल मांडून अजित पवार यांनी मिंधेंशी हातमिळवणी केली आणि(पान १ वरून) २५ हजार कोटी रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्याच्या तपासात उलटी चक्रे फिरली. अधिक तपासात काहीच हाती लागले नाही, असा निष्कर्ष काढून आर्थिक गुन्हे शाखेने अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. हा अहवाल विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांचापुढे सादर करण्यात आला. त्यावर ईडीच्या वकिलांनी विरोध केला आणि या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी परवानगी मागितली. त्या अनुषंगाने न्यायालय ५ मार्चला ईडीचा युक्तिवाद ऐकून घेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर १५ मार्चच्या सुनावणीवेळी न्यायालय क्लोजर रिपोर्ट स्विकारणार की नाकारणार? याकडे पवार कुटुंबीयांसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.