जरांगेंकडून निवडणुकीची तयारी ?उमेदवारी अर्ज भरण्याच्या चर्चाना उधाण..

24 प्राईम न्यूज 9 Mar 2024.
मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, अशी

चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी उमेदवारी अर्जाबाबत केलेल्या विधानामुळेच ते आगामी निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चानी जोर धरण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारी अर्ज भरणे हा माझा नाही तर समाजाचा निर्णय असेल, असे विधान त्यांनी शुक्रवारी केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऐकतात आणि आमचा करेक्ट कार्यक्रम करणार असे म्हणतात, पण मर्यादा तोडल्या तर मराठा समाज त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेल. मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. ते माझे काही करू शकत नाहीत आणि केले तर माझ्या घरावर तुळशीपत्र आहे, पण मराठे आता फॉर्म भरत आहेत आणि त्यांची फजिती होणार आहे. त्यांना टेन्शन येणार आहे, पण फॉर्म भरणे हा माझा निर्णय नाही, तर हा समाजाचा निर्णय आहे, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.