आमची सत्ता आल्यानंतर राणे आमचा तिहारमध्ये असतील-संजय राऊत

24 प्राईम न्यूज 6 Apr 2024. आमची सत्ता येणार असून आमची सत्ता आल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे तिहार कारागृहात असतील, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केला.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा पक्षप्रमुख) उद्धव ठाकरे यांना अटक होईल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेदरम्यान केले होते. याबाबत प्रश्न विचारला असता राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, दोन महिन्यांनंतर आमची सत्ता येते आहे. त्यावेळी नारायण राणे यांच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल उघडल्या तर दोन महिन्यांनी ते तिहार जेलमध्ये असतील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
जागावाटपाच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह आम्हीकाम करतो आहोत. आघाडी धर्म आम्ही सगळेच पाळतो आहोत. काँग्रेसही पाळते आहे, आम्हीही पाळतो आहोत. आता कामाला लागले पाहिजे. रामटेकमध्ये आमचा उमेदवार होता तिथे त्यांनी उमेदवार जाहीर केला आम्ही काही बोललो का? आता तिथे आम्ही त्यांचे काम करू, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. काँग्रेस नेत्यांना आम्ही सांगलीत भेटणार आहोत. विश्वजीत कदम, विशाल पाटील हे आमचेच आहेत. आघाडीत प्रत्येक पक्षाला वाटते की हा मतदारसंघ आपल्याकडे राहावा, मात्र आघाडीत जागा इकडे तिकडे होत असतात. भाजपशी युती असतानाही असे झाले आहे. इथे तीन पक्ष आहेत. विशाल पाटील यांच्याविषयी आम्हाला आस्था आणि प्रेम आहे. त्यामुळे विशाल पाटील यापुढे संसदेत कसे जातील याची काळजी शिवसेना घेईल, असे संजय राऊत म्हणाले.
