सलमान खानच्या घराजवळ गोळीबार. -गुन्हे शाखा-एटीएसकडून आरोपींचा शोध. – सुरूबिष्णोई टोळीचा सहभाग असल्याचा संशय.

24 प्राईम न्यूज 15 Apr 2024
मुंबई बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ रविवारी सकाळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला. गोळीबारानंतर दोन्ही मारेकरी मोटारसायकलवरून पळून गेले. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसले तरी या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बिष्णोई टोळीकडून हा गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत हल्लेखोरांच्या अटकेसाठी गुन्हे शाखेसह एटीएसला स्वतंत्रपणे शोधमोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसच्या वीसहून अधिक पथकांनी हल्लेखोरांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
आरोपींवर कडक कारवाई – मुख्यमंत्री
कोणत्याही प्रकारे गुन्हेगारांना पाठीशी घालण्यात येणार नसून पोलीस कडक कारवाई करतील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, सलमान खानच्या घराबाहेर जो गोळीबार झाला तो दुर्दैवी प्रकार आहे. मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. सलमान खानशीही बोललो, त्याला दिलासा दिला आहे. कायदा हातात घेणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. पोलीस कडक कारवाई करतील, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस योग्य ती कारवाई करत असून योग्यवेळी माहिती दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.