अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण, तीन जण ताब्यात..

24 प्राईम न्यूज 16 Apr 2024
रविवारी पहाटे ५ वाजता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर २ अज्ञात बाईकस्वारांनी गोळीबार केला होता. हवेत ४ ते ५ गोळ्या फायर करून शूटरने परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. गोळीबारानंतर दोघेही मेहबूब स्टुडिओजवळ गेले. तिथे त्यांनी एका रिक्षाचालकाला वसईला जाण्याचा रस्ता विचारला होता. काही वेळानंतर त्यांनी माऊंट मेरीजवळ बाईक सोडून रिक्षातून पलायन केले होते. रिक्षातून वांद्रे रेल्वे स्थानकात आल्यांनतर ते दोघेही सांताक्रूझ येथे उतरले. सांताक्रूझ येथून वाकोला तसेच नंतर त्यांनी रिक्षातून नवी मुंबई असा प्रवास केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला असून ते सर्व फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
या फुटेजवरून एका आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचे नाव विशाल उर्फ कालू असून तो गँगस्टर रोहित गोदाराचा खास सहकारी म्हणून ओळखला जातो. विशालच्या दुसऱ्या सहकाऱ्याची ओळख पटली नसली तरी तो राजस्थानचा रहिवासीअसल्याचे बोलले जाते. गुन्ह्यातील बाईक पोलिसांनी ताब्यात घेतली असून ही बाईक पनवेल येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या मालकीची आहे. त्याने ती बाईक शूटरला विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच चौकशीतून दोन्ही शूटर गेल्या एक महिन्यापासून पनवेल येथे वास्तव्यास होते. तिथे त्यांनी एक घर भाड्याने घेतले होते. त्यामुळे बाईक विक्री करणाऱ्या व्यक्तीसह घर भाड्याने देणाऱ्या घरमालकाची पोलिसांनी चौकशी केली होती. या दोघांनी कोणाला संशय येऊ नये म्हणून ते नोकरीसह इतर कामासाठी पनवेल येथे आल्याचे सांगत होते. याच दरम्यान त्यांनी सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसची रेकी केली होती. त्यानंतर त्यांनी वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी करून ती माहिती रोहित गोदाराला दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या दोन्ही रेकीदरम्यान सलमान तिथे कधी येतो, किती वेळ राहतो, कधी जातो, त्याच्यासोबत त्याच्या खासगी सुरक्षारक्षकासह पोलिसांच्या सुरक्षेची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस बंदोबस्तात सलमानच्या दिशेने गोळीबार करणे शक्य नसल्याने त्यांनी पहाटे त्याच्या घराजवळ गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या गोळीबाराचे धागेदोरे तिहार जेलपर्यंत पोहचल्याने मुंबई पोलिसांचे एक विशेष पथक तिहार जेलमध्ये जाणार आहे.