एस.टी.चे वाहतूक नियंत्रक एल. टी. पाटील झालेत मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक..

अमळनेर/प्रतिनिधी
अमळनेर -येथील एस टी आगाराचे वाहतूक नियंत्रक तथा महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष एल. टी.पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे शासकीय स्वीय सहाय्यक पदी नियुक्ती झाली असून याबाबतचे पत्र काल रोजी त्यांना प्राप्त झाले.
मूळचे अमळनेर तालुक्यातील दापोरी येथील असलेले एल. टी. पाटील हे अमळनेर आगारात वाहक म्हणून कार्यरत होते.त्यानंतर वाहतूक नियंत्रक पदी त्यांची बढती झाली होती.कामगारांच्या हितासाठी सदैव कार्यरत राहत असल्याने कामगार संघटनेचे नेते म्हणून ते जिल्हा व राज्यभर प्रचलित झालेत तसेच अमळनेर तालुक्यात राजकीय वर्तुळात देखील त्यांनी आपला ठसा उमटविला.प्रशासकीय कामकाजाचा उत्तम अनुभव म्हणून मंत्री अनिल पाटील यांनी प्रशासनाकडे स्वीय सहाय्यक पदासाठी त्यांची मागणी केली होती,यानुसार नियुक्ती आदेश त्यांना देण्यात आल्याने त्यांनी अमळनेर आगराचा पदभार सोडून मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कामकाज स्वीकारले आहे.
त्यांच्या या नियुक्ती बद्दल माजी जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील, राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शिवाजीराव पाटील, महेंद्र बोरसे, प्रा. सुरेश पाटील, समाधान धनगर यांनी सत्कार करून अभिनंदन केले.