वर्ल्ड चॅम्पियन्सचे मुंबईत स्वागत ! -टीम इंडियाची मरीन ड्राईव्ह ते वानखेडेपर्यंत जंगी मिरवणूक

24 प्राईम न्यूज 5 Jul 2024. शुक्रवारी सायंकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास टी-२० वर्ल्डकप विजेत्या टीम इंडियाची ओपन डेक बस नरिमन पॉईंटच्या रस्त्यावर दाखल होताच निळ्या जर्सीत मरीन ड्राईव्हवर उसळलेल्या लाखो क्रिकेटप्रेमींच्या अंगात एकच उत्साह संचारला. मोठ्या जोशात इंडिया… इंडिया…ची नारेबाजी सुरू झाली. हाती तिरंगा, रोहित, विराट, हार्दिकचे मोठे कटआऊट घेऊन चाहते टीम इंडियाचे स्वॅगने स्वागत करण्यात भान हरपून गेले. पावसाची पर्वा न करता नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी २.२ किमी अंतरापर्यंत टीम इंडियाची जंगी विजयी मिरवणूक निघाली. यावेळी मरीन ड्राईव्ह परिसरात सुमारे ३ लाखांहून अधिक क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केली होती. ओपन डेक बसमधील टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूने तितक्याच उत्साहात पाठीराख्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. कधी वर्ल्डकप उंचावून, कधी हात हलवत, तर कधी फोटोला पोझ देत सर्वच खेळाडूंनी चाहत्यांचे दिल खूश केले. तब्बल २ तासानंतर ही बस वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झाली. येथेही हजारोंच्या संख्येने चाहते आधीच उपस्थित होते. बीसीसीआयने घोषणा केल्यानुसार टीम इंडियाला चाहत्यांच्या साक्षीने विशेष सत्कार समारंभात १२५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले.