तुतारी विधानसभेतही वाजणार शरदचंद्र पवार गटाला पक्ष म्हणून मान्यता. -देणगी स्वीकारण्याचा अधिकारही मिळाला..

24 प्राईम न्यूज 9 Jul 2024 . राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला लोकसभेतील तुतारी चिन्ह आता विधानसभा निवडणुकीतही वापरता येणार आहे. त्यासोबत राजकीय पक्षासाठी देणगी स्वीकारण्याचाही अधिकार पक्षाला कलम २९ ब अंतर्गत मिळाला आहे. शरदचंद्र पवार गटाला मिळालेला हा मोठा दिलासा मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ जागा जिंकल्या आहेत. यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज दिल्लीत आमच्या ४ वेगवेगळ्या सुनावण्या होत्या.शरद पवारांनी स्वतः स्थापन केलेला पक्ष काढून घेण्यात आला तरी लोकसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आशीर्वाद दिला. आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात मिळालेले तुतारी चिन्ह पुढील विधानसभा निवडणुकीतही कायम राहिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हाला राजकीय पक्ष म्हणून देणगी घेण्याचा अधिकार नव्हता. टॅक्स बेनिफिट मिळत नव्हते, परंतु निवडणूक आयोगाने आमची ही विनंती मान्य केली आहे. तुतारी चिन्हाबद्दल कोणताही संभ्रम राहू नये म्हणून तुतारीसारखे दूसरे कोणतेही चिन्ह आगामी निवडणुकीत ठेवू नये, अशी आम्ही विनंती केली आहे. त्यावर आयोगाने नंतर विचार करू, असे म्हटले आहे.