मासिक पाळीच्या ४ दिवसांत महिलांना सुट्टी ? धोरणात्मक निर्णयाचा केंद्र, राज्यालाच अधिकार मत विचारात घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश.

24 प्राईम न्यूज 9 Jul 2024. दर महिन्याला मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना होणारा त्रास पाहता या काळात त्यांना सुट्टी देण्यात यावी, अशी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला काही सूचना केल्या आहेत. राज्य सरकार तसेच संबंधितांशी बोलून त्यांचे मत घ्यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सुचवले आहे. तसेच यासाठी काही धोरण आखता येईल का याकडेही लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. या काळात सुट्टी मिळाल्यास महिलांमध्ये कामाचा उत्साह वाढेल, मात्र ही सुट्टी अनिवार्य केल्यास नुकसानही होऊ शकते, असे निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, हा एक धोरणात्मक निर्णय आहे. तो निर्णय केंद्र आणि राज्य सरकारच घेऊ शकतात. यासोबतच त्यांनी याचिकाकर्त्याला महिला आणि बालविकास मंत्रालयाकडे जाण्याचा सल्ला दिला. महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी देण्यासाठी नियम करावेत, तसे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना द्यावेत, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. याचिकेद्वारे विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांसाठी सुट्टीची मागणी करण्यात आली होती.
मासिक पाळीच्या काळात देशभरातील विद्यार्थिनी आणि महिलांसाठी सुट्टीची मागणी – करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच – निर्णय दिला होता. हा धोरणात्मक निर्णय असल्याने – यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज करण्यास सांगण्यात आले होते, मात्र अद्याप यासंदर्भात कोणताही निर्णय – घेण्यात आला नसल्याचे ज्येष्ठ वकिलांचे म्हणणे आहे.