आबासो.व.ता.पाटील यांच्या स्मृत्यर्थ आयोजित.  -अमळनेरच्या आरोग्य शिबीरात ८५६ रुग्णांची मोफत तपासणी.

0


आबिद शेख/अमळनेर. अमळनेर येथील शिक्षण महर्षि आबासो. व.ता.पाटील यांच्या चतुर्थ पुण्य स्मरणार्थ येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्ये मंगळवारी आयोजित मोफत महा आरोग्य शिबीरात ८५६ रुग्णांची वैद्यकीय तपासणी करुन गरजूंना गोळ्या – औषधी मोफतच देण्यात आल्या. शेतीकामाचे दिवस असतांना देखील या शिबिराला रुग्णांकडून वाढता प्रतिसाद मिळाला.
या शिबीराचे उद् घाटनाचा राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सह सचिव अशोक आत्राम यांच्या हस्ते व विद्युत महावितरण कंपनीचे संचालक डॉ.मुरहरी केळे यांच्या अध्यक्षतेखाली सोपास्कार झाला. केळे व्यक्त झाले की, शिक्षण क्षेत्रात आबासो. व.ता.पाटील यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. कर्तृत्ववान पुरुष कुटुंबावर संस्कार टाकून जातो. त्यांचे कार्य मुलांनी पुढे नेत वसा चालवायचा असतो. सुदैवाने आबांची मुले- सूना त्यांच्या समाज सेवेचा वसा पुढे नेत आहेत. हीच खरी आबांची पुण्याई होय. केळेंनी आई आणि वडीलांवर स्वतंत्र २ पुस्तके काढली आहेत. त्याची त्यांनी आबांचा मोठा मुलगा विवेकानंद भाऊसाहेब आणि कन्या निवेदिता माईंना पुस्तकांची १-१ प्रत दिली.
आरोग्य विभागाचे सह सचिव अशोक आत्राम म्हणाले की, चांगले विचार तर आपण खूप ऐकतो पण ते प्रत्यक्ष आचरणातून दिसले पाहिजे. त्यांनी कवियत्री बहिणाबाई चौधरींच्या कवितेची मन वढाळ-वढाळ ही पंक्ती ऐकविली. मनावर काबू मिळविता आला पाहिजे. मन प्रसन्न राहिले तर शरीराच्या व्याधीदेखील आपल्याला लवकर जडत नाही असा अनुभव कथन केला.
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अमरावती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अरुणाताई गावंडे यांनी व.ता.आबांसह त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक केले. आबांचा मुलगा विवेक भाऊसाहेब यांनी नव्या मुंबईत कामोठे परिसरात संत गाडगे बाबा विचारमंच काढून त्यांनी समाजकार्य सुरु केले आहे. अशा धडपड्या लोकांना आपण सगळ्यांनी लिप्ट दिली पाहिजे.
व.ता. आबांची स्नुषा डॉ. ज्योती श्रीकांत पाटील यांनी सांगितले की, आबा बाप माणूस होते. त्यांच्या कार्यांपैकी एकजरी कार्याचा १% भाग आपण करुन दाखविला तरी धन्य होवू. आता तर आबांची तिसरी पिढी पुढे येत आहे. विवेक भाऊसाहेबांची कन्या तन्वी ही पुढील वर्षी डॉक्टर होत आहे तसेच निवेदितामाईंचा मुलगा पॅरा मेडिकलचा कोर्स पूर्ण करीत आहे.ते दोघे पुढील वर्षाच्या शिबीरात सहभागी झालेले दिसतील असे डॉ. ज्योती पाटील यांनी सूतोवाच केले.
आमच्या गोरगरीब गरजू लोकांना उपचारासाठी काही अडचण आल्यास आल्यास आत्राम साहेबांनी त्यांच्या पातळीवर सहकार्य करावे अशी विनंती डॉ. श्रीकांत वसंतराव पाटील यांनी जाहीरपणे केली. सूत्र संचलन योगेश पाटील यांनी केले. या वेळी व्यासपीठावर भूषण जयकर पाटील, जिजाबराव पाटील व साहेबराव चव्हाण हे देखील होते.
या शिबीरात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. श्रीकांत पाटील, मधुमेह तज्ज्ञ डॉ. ज्योती श्रीकांत पाटील, बालरोग तज्ज्ञ डॉ. मनिष चव्हाण, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. ज्योती चव्हाण, प्रसुति शास्त्र तज्ज्ञ डॉ. महेंद्र चव्हाण व दंतरोग तज्ज्ञ डॉ. विनिता चव्हाण यांनी आपापल्या विषयांच्या रुग्णांची तपासणी केली.
जय ऋतुकमल हॉस्पिटल आणि आय सी यु नवी मुंबई संचलित विघ्नहर्ता हॉस्पिटल,अमळनेर स्व.आबासाहेब व.ता.पाटील फाऊन्डेशन, दै.पुण्य प्रताप परिवार, शि शि वि प्र मं चुंचाळे,तन्वी एज्यु. सोसायटी ऍण्ड करियर अकॅडमी, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने या मोफत महा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी गोवर्धनचे माजी सरपंच देविदास आबाजी व नगावचे डॉ.एन आर पाटील यांचे व प्रमुख अतिथींचे स्वागत दै.पुण्य प्रतापचे मुख्य संपादक भाऊसाहेब विवेकानंद पाटील व त्यांचे बंधू सयाजीराव पाटील यांनी केले.
शिबिराच्या यशस्वीतेत रविंद्र ठाकूर, प्रा.प्रशांत पाटील, मनिषा पाटील, प्रा. योगिता पाटील, निवेदिता माई, रावसाहेब पाटील आदिंचे योगदान होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!