धुळे महानगरपालिकेने जनसेवेचे धोरण वेशीवर टांगून दिले आहे. म्हणून जनहितासाठी हा उपोषणाचा प्रपंच.

0

धुळे (अनिस खाटीक)


धुळे मनपाच्या विरोधात 3 जुलै रोजी उपोषण करणे बाबत सूचित केले होते.यासंदर्भात दिनांक २ जुलै रोजी म.आयुक्त धुळे मनपा यांनी मी केलेल्या मागण्यांच्या संदर्भात खुलासा पत्र पाठवून नियोजित उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली होती. मात्र आयुक्त यांनी ६ मुद्द्यांबाबत केलेला खुलासा निखालस खोटा व जनतेची दिशाभूल करणारा आहे.
मुद्दा क्रमांक १ नुसार म.आयुक्त यांना सद्यस्थितीत शहरातील नागरिकांमध्ये कुठलाही असंतोष नसल्याची उपरती झाल्याचे दिसते. वास्तविकत: देवपूरसह शहरातील रस्ते – गटारी – खुल्या जागांचा विकास करणे बाबतचे मागणी निवेदन माझ्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेले आहे गेल्या महिन्याभरात मनपा समोर झालेली आंदोलने आयुक्त साहेब सोयीस्करपणे विसरल्याचे दिसते. देवपूरातील प्रभाग क्रमांक १,२,३,४,५,आणि ६या प्रभागात भूमिगत गटारी योजनेमुळे रस्त्यांची झालेली चाळण आणि वाईट अवस्था दुरुस्त करणे आवश्यक आहे.यासंदर्भात गेल्या काही महिन्यात मनपा समोर आंदोलने देखील झाली आहेत.शहर भागातील प्रभाग क्रमांक ११,१२,१३,१४,१५,१६,१७,१८ येथे देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. दोन दिवसापूर्वी खड्डेमय रस्त्यामुळे अपघात होऊन एका महिलेचे दात पडले यापूर्वी देखील कितीतरी मायमाऊल्यांचे अपघात झालेले आहेत. तरीही निर्लज्जपणे मनपा प्रशासन खुलासा करते की नागरिकांमध्ये असंतोष नाही.हे घृणास्पद आहे.
मुद्दा क्र २ – घरपट्टी बाबत नागरिकांच्या प्राप्त झालेल्या हरकतींवर नियमानुसार सुनावणी होऊन व तपासणी करून महानगरपालिका योग्य ती कार्यवाही करीत असल्याचा खुलासा महानगरपालिका प्रशासनाने केलेला आहे. मुळात हा खुलासा दिशाभूल करणारा आहे. निव्वळ जनतेचा असंतोष दाबण्यासाठी हरकती मागवायच्या आणि लोकांनी नोंदवलेल्या हरकतींवर कुठल्याच प्रकारची कारवाई करायची नाही अशी रणनीती मनपा प्रशासनाची असल्याचे निदर्शनास येते.
मुद्दा क्र ३- धुळे शहरातील नागरिकांना नियमित पुरेसा व एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबाबत महानगरपालिका प्रशासनाने खुलासा करताना नमूद केले आहे की सद्यस्थितीत संपूर्ण शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचा पोकळ दावा केलेला आहे वस्तूत: शहरातील प्रत्येक भागात किमान ८ ते ९ दिवसानंतर पाणीपुरवठा केला जातो हे शहरातील नवरंग,नेहरूनगर,बडगुजर,कबीरगंज,जामचामळा येथील जलकुंभावरील असलेल्या नोंदवहीतून सिद्ध होते. अक्कलवाडा पाणीपुरवठा योजनेचा एक पंप चालू करून या नियोजनात फार फरक पडणार नाही. अक्कलपाडा पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी सब स्टेशनची आवश्यकता आहे त्यासाठी अद्याप जागा देखील ताब्यात मिळालेली नाही अशा परिस्थितीत अक्कलपाडा योजनेच्या आड लपण्याचे धारिष्ट मनपा प्रशासन का करीत आहे ?

मुद्दा क्रं.४- मनपा प्रशासन सांगते की कचरा संकलन करण्यासाठी ठेकेदार नेमून दररोज कचऱ्याचे संकलन केले जाते मात्र प्रत्यक्षात सुज्ञ नागरिकाने या शहरातून नुसता फेरफटका जरी मारला तरी लक्षात येईल की शहर कचरामुक्त आहे की कचरायुक्त आहे. वारंवार तक्रारी करून देखील शहरातील गजबजलेल्या भागात पाच कंदील, स्लॉटर हाऊस वडजाई रोड मौलवीगंज, साक्री रोड, दत्त मंदिर या भागात रस्त्यावर आणि रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग आढळतात म्हणजेच महानगरपालिकेने कचरा संकलनाचा केलेल्या दावा किती पोकळ आहे हे लक्षात येते. हद्दवाडी सह मनपा क्षेत्रात फक्त 500 सफाई कामगार आहेत या कामगारांमार्फत रस्ते झाडणे आणि गटारी स्वच्छ करणे इत्यादी कामे केले जातात. गटारी एकदा काढल्यानंतर आठ-आठ दिवस गाळ रस्त्यावर पडून असतो. एक प्रकारे हे आजाराला निमंत्रणच म्हटले पाहिजे.
मुद्दा क्र.५- पावसाळ्यात सात रोग नियंत्रणासाठी शासकीय पातळीवरून मोठ्या प्रमाणात तयारी केल्याचे दिसून येते मात्र धुळे महानगरपालिका याबाबत अनभिज्ञ असल्याचे लक्षात येते यापूर्वी खाजगी आस्थापनामार्फत ६०कर्मचारी एबेटिंग,फवारणी,धुरळणी करीत होते मात्र डिसेंबर २०२२ पासून एबेटिंग,फवारणी,धुरळणी बंद करण्यात आलेली आहे. यासंदर्भात पालिका प्रशासन म्हणते की साथीचे रोग नियंत्रणासाठी जिल्हा हिवताप कार्यालय व महापालिका अशी संयुक्तिक कार्यवाही करण्यात येत असून मलेरिया विभागासाठी २५ अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुळातच धुळे महानगरपालिकेच्या आस्थापनावर १००० सफाई कामगार आवश्यक असताना प्रत्यक्षात सफाई कामगारांची संख्या फक्त ५०० आहे. या सफाई कामगारांकडून हद्द वाढीसह संपूर्ण शहराचे स्वच्छता करणे अत्यंत अवघड बाब आहे. अशा परिस्थितीत पालिका प्रशासन अतिरिक्त २५ कर्मचारी कुठून देणार याचे उत्तर म.आयुक्त देतील काय ?
मुद्दा क्रमांक ६ – सद्यस्थितीत धुळे महानगरपालिका हद्दीतील १३५ सार्वजनिक शौचालय युनिट देखभालअभावी जवळजवळ बंद पडलेली आहेत.यापूर्वी तेरा ठेकेदारांमार्फत या सार्वजनिक शौचालयांची देखभाल केली जायची. देखभाल करणाऱ्या तेरा ठेकेदारांनी १५ जून पासून काम बंद केलेले आहे. पालिका प्रशासन या संदर्भात खुलासा करते की वरील सर्व सार्वजनिक शौचालये महानगरपालिकेच्या सफाई कामगारांकडून दररोज स्वच्छ केली जातात वास्तविक हा दावा अत्यंत खोटा आहे कारण एकूण ५०० संख्या असलेले सफाई कामगार काय काय काम करतील आणि प्रत्यक्षात शौचालयाची पाहणी केली असता शौचालयांची अत्यंत विदारक परिस्थिती दिसून येते.
अशा पद्धतीने महानगरपालिका सोई सुविधा देत नाही मात्र निव्वळ थापा मारून वेळ निभावून नेते.खरे तर धुळे महानगरपालिकेने जनसेवेचे धोरण वेशीवर टांगून दिले आहे. म्हणून जनहितासाठी हा उपोषणाचा प्रपंच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!