वाढदिवस दिवशीच मंत्री अनिल पाटील यांचे अमळनेरात आगमन.. -नामदार अनिल पाटलांना अन्न व नागरी पुरवठा महत्वाचे खाते मिळणार…

अमळनेर ( प्रतिनिधि )
अमळनेर नव्यानेच मंत्री पदाची शपथ घेणारे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांना अन्न व नागरी पुरवठा हे महत्वाचे खाते दिले जाण्याची शक्यता मुंबई येथील सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
यासोबतच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील अनिल पाटील यांना मिळू शकते अशीही शक्यता काही जाणकारांनी काल व्यक्त केली आहे,मात्र याबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.दरम्यान नामदार अनिल पाटील पाटील यांचा शुक्रवार दि 7 जुलै रोजी वाढदिवस असून त्याच दिवशी मंत्री महोदयांचे अमळनेर येथे आगमन होणार आहे.सकाळी 6 वाजता जळगाव येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर वाहनाने ते अमळनेर येथे मंगळग्रह मंदिरात दाखल होणार आहेत.तेथून 9 वाजता बाईक रॅलीद्वारे त्यांची भव्य स्वागत रॅली काढण्यात येणार आहे.सदर रॅली पैलाड,तेथून दगडी दरवाजा, पाच कंदील चौक,सुभाष चौक,कुंटे रोड,बालेमिया,बस स्टॅन्ड येथून त्यांच्या निवासस्थानी दाखल होऊन दिवसभर शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते घरीच थांबणार आहेत.
अनेक ठिकाणी होणार स्वागत
रॅली दरम्यान नामदार अनिल पाटील यांचे भोणे पासून अमळनेर पर्यंत आणि अमळनेरात आल्यावर विविध ठिकाणी जंगी स्वागत करण्यात येणार आहे. स्वागताची जय्यत तयारी आतापासूनच कार्यकर्ते तसेच विविध मंडळांनी सुरू केली आहे. अमळनेर मतदारसंघास प्रथमच मंत्री पद मिळाले असल्याने प्रत्येक जण त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक झाला आहे.
व्यापारी मंडळीही करणार जोरदार स्वागत
अनिल पाटलांच्या रूपाने अमळनेरला प्रथमच मंत्री पद मिळाल्याने शहरातील व्यापारी मंडळी देखील आनंदित झाली असून काहींनी मुंबईत धाव घेऊन त्यांचे अभिनंदन केले आहे, तर बहुसंख्य व्यापारी बांधवानी फोनद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे, तसेच मंत्री महोदयांच्या आगमनाप्रसंगी व्यापारी बांधव अमळनेरात देखील त्यांचे मोठे स्वागत करणार असल्याची माहिती व्यापारी विजय जैन, बिल्डर प्रसन्न जैन यासह व्यापारी बांधवानी दिली आहे.