आता जालना ते जळगाव रेल्वे धावणार या रेल्वेमार्गासाठी 3552 कोटी रुपयांचा निधी झाला मंजूर..

24 प्राईम न्यूज 6 jul 2023 महाराष्ट्रात देखील अनेक रेल्वे संबंधी प्रकल्पांचे कामे सुरु असून काही नवीन रेल्वे मार्गांना देखील मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा रेल्वे मार्ग म्हणजे जालना ते जळगाव यादरम्यानचा जालना ते जळगाव रेल्वे मार्गाची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती व त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये या रेल्वे मार्गाचा अंतिम सर्वे तयार करण्यात आला होता. हा 172 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग असून या मार्गावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आणि मराठवाड्याच्या आराध्य दैवत राजुर चा गणपती देखील जोडले जाणार आहेत.
एवढेच नाही तर मराठवाडा आणि खानदेश पट्ट्यातील ग्रामीण भागाचा तसेच त्या ठिकाणचा औद्योगिक विकास, शेती, व्यापार, दळणवळण, छोटे मोठे लघुउद्योग व पर्यटनाच्या विकासाला देखील या माध्यमातून चालना मिळणार आहे. हा रेल्वेमार्ग जालना या ठिकाणहून पिंपळगाव, पांगरी, राजुर, भोकरदन, सिल्लोड या मार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर आणि जळगाव असा जाणार आहे. एवढेच नाही तर या रेल्वे मार्गाचा फायदा हा पुढे गुजरात राज्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे.