७६३ शिक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा..

24 प्राईम न्यूज 17 jul 2023
राज्यातील २०१७ च्या शिक्षक भरतीतील १९६ व्यवस्थापनाच्या शाळांतील ७६३ रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षण विभागाने या शाळांमध्ये मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे निवड करण्यासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावी या गटातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
राज्यातील २०१७च्या शिक्षक भरतीतील काही पदांवरी भरती प्रक्रिया न्यायालयीन खटल्यांमुळे पूर्ण होऊ शकली नव्हती. आता या शिक्षक भरतीतील अडथळे दूर झाले असून शिक्षण विभागाने ही प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार या रिक्त पदांवर ७६३ जागांसाठी एकूण ५ हजार ५३५ उमेदवारांची प्राधान्यक्रमानुसार संस्थांकडे शिफारस करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने पाठविलेल्या दहा उमेदवारांच्या मुलाखतीतून संस्थांना एकाची निवड करावी लागणार आहे. या उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यबाबतची कार्यवाही शाळांना ११ ऑगस्टपर्यंत पार पाडावी लागणार आहे.
यावर्षी पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्याच्या दृष्टीने सध्या संचमान्यतेची प्रक्रिया सुरू आहे. सद्यस्थितीत राज्यातील जिल्हा परिषदेच्या ५४ हजार १९३ शाळांची, तर सुमारे १४ हजार खासगी शाळांच्या संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.