पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे शहर वाहतूक नियंत्रण विभागातर्फे सुरक्षित वाहतूक तसेच आरएसपी चे प्रशिक्षण !

प्रतिनिधि/एरंडोल
आज दि २८ जुलै रोजी जळगाव शहर वाहतूक नियंत्रक कक्षातील अधिकाऱ्यांनी सुरक्षित वाहतूक अभियानांतर्गत पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांना संबोधित केले.
शाळेच्या परिपाठाच्या वेळेत उपरोक्त कार्यक्रम घेण्यात आला. शाळेचे उप-प्राचार्य दिपक भावसार यांनी प्रमुख प्रशिक्षकांचा परिचय करून दिला. पोदार स्कूलचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे आणि सहाय्यक फौजदार सय्यद मुजफ्फर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना स्कूल बस तसेच खाजगी वाहनातून प्रवास करीत असतांना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी ,पायी चालताना रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालावे ,वाहतुकीचे नियम कोणते,रस्त्यावरील अपघात व बचाव याविषयी माहिती दिली. सहाय्यक फौजदार सय्यद मुजफ्फर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करीत विद्यार्थ्यांनी आर एस पी (रस्ता सुरक्षा पोलीस) ह्या विद्यार्थीभिमुख कार्यक्रमाची माहिती दिली. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एन सी सी प्रमाणेच आर एस पी मध्ये सहभाग नोंदवून रस्ता सुरक्षा तसेच अपघात नियंत्रण यंत्रणेत वाहतूक प्रणालीस सहकार्य करावे असे आवाहन केले. १८ वर्षे वय पूर्ण झाल्यावरच परवान्यासह वाहन चालवावे असे निक्षून सांगितले.पालक वाहन चालवीत असताना त्यांना हेल्मेट घालणे तसेच सीटबेल्ट च्या वापराविषयी आग्रह केलाच पाहिजे असे आवाहन केले. वरील कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम तसेच रस्त्यावरील अपघाताची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी मार्गदर्शन दिल्याबद्दल प्राचार्यांनी संस्थेच्या वतीने प्रशिक्षकांचे आभार मानले. यावेळी शाळेचे उप-प्राचार्य दिपक भावसार,शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.