शालेय पाठ्यपुस्तकांमधील कोरी पाने समाविष्ट करण्याचा निर्णय रद्द..

24 प्राईम न्यूज 29 Jan 2025.
राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने जोडण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने रद्द केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पुन्हा पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
दप्तराचे ओझे कमी करणे आणि विद्यार्थ्यांना शालेय लेखनासाठी आवश्यक सुविधा पुरवणे या उद्देशाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये कोऱ्या पानांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, विद्यार्थ्यांकडून या पानांचा अपेक्षित उपयोग होत नसल्याचे आढळून आल्याने हा निर्णय रद्द करण्यात आला.
बालभारतीच्या संचालकांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले की विद्यार्थी पुस्तके आणि वह्या दोन्ही शाळेत घेऊन जात असल्याने कोऱ्या पानांचा उद्देश सफल होत नाही. त्यामुळे ८ मार्च २०२३ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करून यापुढे पाठ्यपुस्तकांमध्ये कोऱ्या पानांचा समावेश न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.